Friday, February 21, 2014

भावड्याची लव्हस्टोरी भाग २


भावड्याची लव्हस्टोरी भाग १

भावड्याला हाक मारण्यासाठी संगी वळली अन्‌ "भावड्या' असे तोंडून निघणार, तोच संगीनं स्वतःचीच जीभ चावली. नंतर "साहेबराव' म्हणून हाक दिली. मात्र भावड्या तोपर्यंत थेट कॉलेजच्या मैदानात पोचला. "फूल तर दिलं. आता पुढे? ती हाव म्हणली तं.' असा यक्षप्रश्‍न भावड्याला पडला होता. सारखंसारखं तोच प्रसंग डोळ्यासमोर येत असल्याने भावड्या अजूनही गांगरलेलाच होता. "हट्‌.. गुलाबाचं फूल द्यायं होतं. सूर्यफूल कुठून आलं.' स्वतःशीच त्याची बडबड सुरू होती. "काय भावड्या?' अरुण्याच्या आवाजाने भावड्याची तंद्रीच भंग पावली. "चल चहा घेऊ' म्हणत भावड्याने अरुण्याला बसस्टॅण्डवर नेलं. हॉटेलात वाफ ाळलेला चहा पीत असतानाही भावड्याला काही सुधरत नव्हतं.

काही दिवस भावड्या आपल्याच धुंदीत होता. संगीला आपण परपोज केलं. हे त्याला कळतच नव्हतं. फक्त एक "डेरींग' करून फूल दिलं. एवढंच त्याला वाटायचं. अधूनमधून मोरपीस अंगावर फिरवल्यासारखा अनुभव यायचा. मग आपसुकच एखादे गाणे आठवायचे. मात्र पुन्हा कॉलेजमधील तो प्रसंग आठवला की, "तिला काय वाटलं असलं' असा प्रश्‍न त्याला पडायचा. सुहासला फोन लाऊन विचारावं. असा विचारही भावड्याच्या मनात यायचा. तीन - चार दिवस कॉलेजकडे फिरकण्याची भावड्याची हिंमतच झाली नाही.

कॉलेजला गेला तर डी. एड.च्या इ मारतीकडे नजरसुद्धा टाकायची हिंमत केली नाही. "यार सुहास्या, मी फूल दिलंय' असे म्हणत भावड्यानं एकदा अख्खी स्टोरी सांगितली. सुहास मात्र "काही नाही रे. होत असतं असं.' असे म्हणत तो विषय हसण्यावारी नेला.
भावड्या कॉलेजच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत बसलेला असताना त्याला समोरून संगीची मैत्रीण येताना दिसली. ती थेट इकडेच येत असल्याचे बघून भावड्या चरकला. मात्र ती बाजूने निघून गेली. जाता-जाता हळूच "काय भावड्या, किमान वाळलेले सूर्यफूल तरी द्यायचं होतं ना,' असा डायलॉगही हाणला. आता हे काय नवीनच. "हिला कसं काय कळलं. बोंबला ! आता काही खरं नाही. अख्ख्या कॉलेजात बोभाटा झाला तर आपली वाटच लागली. घरी बा तर लाकूड घेऊनच मागं लागंल. सं गीनच तिला सांगितलं असंल.' असे एक ना दोन प्रश्‍नांची जंत्रीच भावड्याच्या डोळ्यासमोर फिरू लागली. संज्याने दूरवरूनच हे पाहिले होतं. "काय म्हटली ती. डी.एड.मधी शिकती ना ती.' आल्याआल्याच त्याने प्रश्‍न केला. "अं' भावड्या पुन्हा विचारचक्रातून बाहेर आला. "अं, अं काय करायला बे. खरं सांग' संज्या आता सोडत नाही. हे पाहून भावड्याने "कोण, कव्हा' असे उलट प्रश्‍नच त्याला विचारायला सुरवात केली. वेळ निभावून नेली.

एक दिवस झाला, चार दिवस झाले. भावड्याचं नेमकं काय चालंलय. असा प्रश्‍न पंडितरावांना (पिताश्री) पडला. "उन्हाळा सरत आला. शेतीची कामं का तुझा बा करंल.' म्हणत एक दिवस पिताश्रींनी भावड्याला घेरलाच. "मी कुठं नाही म्हणलो तात्या.' भावड्या बोलला. "येडी घुमावू नकुस. घरी दोन-दोन ट्रॅक्‍टर पडून हाय. नांगरटी कोणी करायची. आजपासनचं शेतीची कामं सुरू करायची. ते कॉलेज फिलेज लई झालं. नीट शेतात जायचं. यंदा धूळपेरणी करायची आपल्याला. काय? आधीच दुष्काळानं गेल्यावर्षी काहीबी हातात नाही लागलं' तात्या एका मागून एक ऑर्डर देत होते.

भावड्या यावेळेस विरोध करायच्या मुडमधे नव्हता. तात्याला जर कळलं. तर तो सोलूनच काढंल. एवढे त्याला माहीत होतं. आता कामाला लागल्याशिवाय पर्याय नाही. असे लक्षात आल्यावर "जा रहा हूँ पिताजी. फिर कभी घर वापस नही आऊंगा', असा हिंदी सिनेमाचा डायलॉग हाणून भावड्याने तेथून झटकन पाय काढला. भावड्याचा डायलॉग ऐकून तात्याने पायतलं पायताण हातात घेऊन भावड्याच्या दिशेने भिरकावलं. "लई डायलॉग सुचायले का बे तुले' तात्या ओरडले. तोपर्यंत भावड्या गायब झाला होता.

भावड्याची लव्हस्टोरी भाग १


"ना ही... तू खरंच सांगतो ना!', "पाह्य बरं का!', "काहीबी सांगू नको', "ठीक है ना मंग... सरळ जाऊन सांगून टाक', "नाही त एक काम कर तिचा मोबाईल नंबर असंन'... एकापाठोपाठ एक प्रश्‍न, त्या प्रश्‍नांची उत्तरे, त्यावर उपाय, फार झालं तर "सोलूशन'... असं काहीबाही सुरू होतं. नाना, संजू, बाळ्या, अरण्या यांना जे सुचत होते, ते भावड्याला सांगत होते. एव्हाना पार्टी संपून भावड्याच्या गहन समस्येवर सर्वजण चर्चा करू लागले होते. सुहास मात्र हा प्रकार "क्रश'सारखाच असल्याचे समजत असल्याने तो या सर्वांची मजा बघत होता. भावड्या बिचारा मात्र पुरता भांबावून गेला होता. 

तालुक्‍याच्या गावात भावड्याच्या आर्ट-कॉमर्स कॉलेजला खेटूनच डी.एड. कॉलेज होते. डी.एड.ला असलेल्या "संगी'ला बघताच भावड्या पुरता दीवाना झाला होता. भावड्याने इकडून तिकडून तिचे नाव संगीता आहे एवढी माहिती महत्प्रयासाने काढली होती. तात्या आणि माय दोघंपण भावड्याले काय झाले म्हणून अधूनमधून चर्चा करायचे. त्यांनी मात्र फार सिरीयस घेतले नव्हते. "आर... दोन घास तं नीट गिळत जाय.. जवा पाव्हं तव्हा घाईतच राहतुया...' माय अधूनमधून भावड्याला म्हणायची. भावड्याची गॅंग मात्र "एकदा तू सांगूनच टाक' या भूमिकेवर ठाम होती. भावड्याले नेमके आपल्याला काय होते आहे, हेच कळत नव्हते. ते न कळणे म्हणजेच टेन्शन होते. "प्रपोज' करायचे तर दूरच राहिले. 

पंचवीस एकर शेतही भावड्याला अपुरे पडत होते. भावड्याने हप्त्याने "टच स्क्रीन'चा मोबाईल घेतला होता. "आठ जीबी'चं मेमरी कार्ड टाकलेलं होतं. शेतात तासन्‌तास बसून राहायचे. मोबाईलवर पार "मैरे नैना सावन भादो'पासून आताच्या "सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मै'पर्यंतची गाणी वारंवार वाजविली जात होती. सूर्य अस्ताला जाईपर्यंत भावड्या शेतातच टाईमपास करायचा. रात्री अंगणात बसला असला तरी याच्या मोबाईलवर हळू आवाजात किशोरचे "दर्दभरे गीत' सुरू असायचे. कधी कधी गॅंगमध्ये बसलेला असल्यावर भावड्या "तुम्हाला सांगून ठेवतो आपलं संगीवर प्रेम आहे' हा "वळू'मधला डायलॉग हाणायचा. एव्हाना संगीच्या मैत्रिणींनाही भावड्याचे हे प्रेमप्रकरण कळले होते. त्याही संगीताला चिडवायला लागल्या होत्या. तिला मात्र या सर्वांचा राग यायचा. एकदा भावड्याने "डेरिंग' करायचे ठरविलेच. संगीला एक फूल द्यायचे आणि तिला सगळे सांगून टाकायचे, असा निश्‍चय भावड्याने केला. हो-नाई हो-नाई करीत भावड्या कॉलेजला पोचला. यशवंती (मोटारसायकल) आज शाम्पूने धुऊन काढली असल्याने चकाकत होती. कॉलेजला जाण्यापूर्वी रस्त्यातल्या एका शेतातूनच भावड्याने फूल तोडले. आता फूल ते फूलच. मग ते सूर्यफुलाचे असले म्हणून काय झाले. भावना महत्वाच्या. मुलींना कोणती फुले आवडतात किंवा गुलाबाची फुले द्यावी लागतात, याची जाणीव भावड्याला नव्हती. त्यामुळे याने सूर्यफूल देण्याचा निर्णय घेतला. कॉलेज सुरू व्हायला वेळ होती. व्हरांड्यात संगी एकटीच असल्याचे बघून भावड्याने सूर्यफूल देऊनच टाकले. एकदाची डेरिंग केलीच. सूर्यफूल दिल्यानंतर पुढे काय बोलावे ते न कळाल्याने भावड्याला दरदरून घाम फुटला. आता जास्त वेळ उभे राहण्यात अर्थ नाही, हे लक्षात आल्यावर तो झटकन बाहेर पडला. संगीला वाईट वाटले की चांगले वाटले... याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. भावड्याची लव्हस्टोरी वळणावळणाने सुरू झाली होती.